क्रीडा

347

SBEU Carrom Trophy Description Tanaya

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहकार्याने आयोजित राज्य स्तरीय शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीने पटकाविले. महात्मा गांधी विद्यालयाच्या तनया दळवीने संपूर्ण डावात अचूक खेळासह राणीवर कब्जा राखत पोद्दार अकॅडमी-मालाडचा उदयोन्मुख कॅरमपटू प्रसन्न गोळेचा ८-५ असा निसटता पराभव केला. प्रारंभी आघाडी घेऊनही प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार प्रमोद पार्टे, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत १६ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह पुरस्काराने गौरविण्यात आले. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्तचा हा मोफत क्रीडा उपक्रम युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आदी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीमध्ये तनया दळवीने शारदाश्रम विद्यामंदिरच्या सोहम जाधवला १९-९ असे तर प्रसन्न गोळेने पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेला ९-८ असे पराभूत केले. ध्रुव शाह, आर्यन राऊत, नील म्हात्रे, संचिता मोहिते यांनी उपांत्यपूर्व तर श्रीशान पालवणकर, वेदांत राणे, ध्रुव भालेराव, केवल कुलकर्णी, ग्रीष्मा धामणकर, वेदांत लोखंडे, प्रेक्षा जैन, अद्वैत पालांडे यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार मिळविला. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर व ओमकार चव्हाण यांनी प्रमुख पंचाचे कामकाज केले. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४४ कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. शालेय सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या सहकार्याने कामगार दिनी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभासदांच्या १६ वर्षाखालील पाल्यांसाठी विनाशुल्क सुपर लीग कॅरम पात्रता फेरी २० एप्रिल रोजी दादर येथे होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!