लाल डागाच्या पलीकडे: दोन स्पेशालिस्ट्सनी एकाही चीराशिवाय एका बाळाच्या पापणीवरील हिमनजिओमावर यशस्वी उपचार केले
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई प्रोप्रानोलॉलद्वारे इन्फंटाईल हिमनजिओमाचे व्यवस्थापन करण्यासाठी पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आणि कार्डिओलॉजी विभागांचा एकत्रित दृष्टिकोन वापरते.

POSTED BY : ANAGHA SAKPAL DATED ON : 09/10/2026 (9004379946) 📞
मुंबई (NHI24) : नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई येथील स्पेशालिस्ट्सनी नुकतेच एका तान्ह्या बाळाच्या पापणीवरील हिमनजिओमावर प्रोप्रानोलॉलचा वापर करून यशस्वी उपचार केले. प्रोप्रानोलॉल त्रासदायक इन्फंटाईल हिमनजिओमासाठी प्रस्थापित सिस्टेमिक औषधोपचार आहे. ही केस पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजीच्या कन्सल्टंट डॉ. हिमिका गुप्ता आणि पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे सिनियर कन्सल्टंट व क्लिनिकल लीड डॉ. सुप्रतिम सेन यांनी एकत्रितपणे हाताळली.
इन्फंटाईल हिमनजिओमा ही रक्तवाहिन्यांची सौम्य स्वरूपाची गाठ असते, जी बाळाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत वेगाने वाढू शकते आणि डोळ्याच्या आसपास असल्यास दृष्टी आणि डोळ्यांच्या सामान्य विकासात अडथळा निर्माण करू शकते. पालकांना बाळाच्या पापणीवर सुरुवातीला निरुपद्रवी लाल डाग किंवा ‘स्ट्रॉबेरी सूज’ वाटू शकणारी ही गाठ काही वेळा केवळ दिसण्यापलीकडे गंभीर परिणाम घडवून आणू शकते.
ही केस पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आणि पेडियाट्रिक कार्डिओलॉजी विभागांनी एकत्रितपणे हाताळल्यामुळे संभाव्य कार्डिओव्हॅस्क्युलर दुष्परिणामांवर बारीक लक्ष ठेवून बाळाला योग्य वैद्यकीय उपचार मिळणे सुनिश्चित झाले.
इन्फंटाईल हिमनजिओमा बालपणात आढळणारी सर्वात सामान्य सौम्य रक्तवाहिन्यांची गाठ आहे. ही गाठ शरीराच्या विविध भागांवर उद्भवू शकते, ज्यामध्ये चेहरा, डोक्याची त्वचा आणि पापण्यांचा समावेश आहे. बऱ्याच लहान आणि गुंतागुंत नसलेल्या हिमनजिओमावर त्वरित उपचारांची गरज भासत नसली तरी पापणीवर असलेल्या गाठींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते, कारण त्यांची वाढ बाळाच्या दृष्टीच्या केंद्रबिंदूमध्ये (बुबुळ) अडथळा आणू शकते.
पापणीवरील हिमनजिओमामुळे टोसिस (किंवा पापणी खाली झुकणे) होऊ शकते आणि यामुळे डोळा सामान्यपणे उघडण्यास अडथळा येऊ शकतो. दृष्टीच्या विकासाच्या अत्यंत नाजूक व महत्त्वपूर्ण काळात डोळा अंशतः झाकलेला राहिल्यास दृष्टीच्या नैसर्गिक वाढीमध्ये अडथळा आणू शकते आणि संभाव्यतः मुलामध्ये दीर्घकालीन दृष्टीदोष निर्माण करू शकते. यामुळे याचे वेळेवर निदान होणे आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या केसमध्ये, वैद्यकीय टीमने शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्याऐवजी प्रोप्रानोलॉल थेरपीची निवड केली. उपचाराची गरज असलेल्या इन्फंटाईल हिमनजिओमासाठी प्रोप्रानोलॉल हा महत्त्वाचा प्रथम श्रेणीचा पद्धतशीर उपचार बनला आहे. हे औषध गाठीचा आकार, रंग आणि रक्तवाहिन्यांचे प्रमाण कमी करू शकते, तसेच गाठीच्या जागेमुळे व वाढीमुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंती दूर करण्यास मदत करते.
पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे सिनियर कन्सल्टंट आणि क्लिनिकल लीड डॉ. सुप्रतिम सेन म्हणाले की, या उपचारादरम्यान काळजीपूर्वक देखरेख ठेवणे आवश्यक असते, कारण प्रोप्रानोलॉल कार्डिओव्हॅस्क्युलर घटकांवर परिणाम करू शकते.
“आम्ही प्रोप्रानोलॉल औषध पेडियाट्रिक कार्डिओलॉजीमध्ये त्रासदाय हिमनजिओमासाठी महत्त्वाचे प्रथम श्रेणीचे उपचार म्हणून, तसेच हृदयाच्या विविध आजारांसाठी सामान्यपणे वापरतो. हिमनजिओमाच्या बाबतीत हे औषध गाठीमधील रक्तवाहिन्यांवर कार्य करते आणि गाठीचा आकार व रंग कमी करण्यास मदत करते. पण, आम्ही लहान बाळांमध्ये प्रोप्रानोलॉल सुरू करतो, तेव्हा योग्य देखरेख ठेवणे महत्त्वाचे असते, कारण हे औषध हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी करू शकते. या केसमध्ये, बाळाने उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद दिला. उपचारांचा प्रतिसाद आणि क्लिनिकल मूल्यांकनावर आधारित, आम्ही पुढील अंदाजे ६ ते १२ महिने ही थेरपी सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे,” असे डॉ. सेन म्हणाले.
हिमनजिओमाचे स्थान पाहता पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी विभागाचा सहभाग विशेषत: महत्त्वाचा होता. शरीराच्या अशा भागांवर उद्भवणाऱ्या हिमनजिओमाच्या तुलनेत जे केवळ दिसण्यापुरते चिंतेचे कारण ठरू शकतात, पापणीवरील गाठ बालकाच्या डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि दृष्टीच्या विकासावर थेट परिणाम करू शकते. पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजीच्या कन्सल्टंट डॉ. हिमिका गुप्ता म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत पापणीवरील हिमनजिओमाकडे पाहण्याचा आणि त्यावर उपचार करण्याचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर बदलला आहे.
“पापणीवरील हिमनजिओमा केवळ दिसण्यापुरता डाग किंवा दोष नसतो. यामुळे टोसिस म्हणजेच पापणी खाली झुकण्याची समस्या उद्भवू शकते, जी लहान मुलांमधील दृष्टी आणि एकूण दृष्टीच्या विकासात अडथळा आणू शकते. पारंपारिकपणे, निवडक मुलांमध्ये पापणीवरील हिमनजिओमासाठी शस्त्रक्रियेचा विचार केला जात असे. पण लहान बाळांमधील शस्त्रक्रियेची आव्हाने असतात, विशेषतः त्यांचे वय, गाठीचे स्थान आणि या ट्यूमरचे रक्तवाहिन्यांशी संबंधित स्वरूप यामुळे जोखीम अधिक असते,” असे डॉ. गुप्ता म्हणाल्या.
गेल्या दशकात प्रभावी आणि विना-शस्त्रक्रिया वैद्यकीय पर्यायांकडे कल वाढला आहे. योग्य कार्डिओव्हॅस्क्युलर मूल्यांकन आणि देखरेखीसह प्रोप्रानोलॉलने महत्त्वाचा उपचार पर्याय उपलब्ध करून दिला आहे. “उपचार योग्य पद्धतीने आणि वेळेवर सुरू केले जातात, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत समाधानकारक असू शकतात,” असे डॉ. गुप्ता म्हणाल्या. शस्त्रक्रियेकडून औषधोपचारांकडे वळलेला हा बदल विशेषतः लहान बाळांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे, कारण प्रभावी पर्याय उपलब्ध असतो, तेव्हा कोणतीही चीरफाड न करता उपचार करणे फायदेशीर ठरते. पण, उपचारांचा निर्णय डॉक्टर अनेक घटकांचे मूल्यांकन केल्यानंतर घेतात, ज्यामध्ये गाठीचे स्थान, आकार आणि कार्यक्षमतेमध्ये गुंतागुंत निर्माण करण्याची संभाव्यता यांचा समावेश असतो.
पापणीवरील हिमनजिओमाच्या बाबतीत बालकाच्या दृष्टीचा विकास सुरक्षित ठेवणे ही प्राथमिक चिंता असते. वेगाने वाढणारी गाठ बाहुलीच्या (प्युपिल) मार्गात अडथळा आणू शकते किंवा पापणीची जागा बदलू शकते, ज्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या दृश्यात्मक संदेशांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून, विशेषतः पालकांना डोळ्याभोवती वेगाने वाढणारी किंवा अधिक स्पष्टपणे दिसणारी खूण किंवा गाठ आढळते, तेव्हा स्पेशालिस्टकडून लवकरात लवकर तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मल्टीडिसिप्लिनरी उपचारांचे महत्त्व या विशिष्ट केसमधून मल्टीडिसिप्लिनरी पेडियाट्रिक केअरचे महत्त्व अधोरेखित होते, विशेषतः दुसऱ्या एखाद्या अवयवावर परिणाम करणाऱ्या आजारासाठी कार्डिओव्हॅस्क्युलर परिणाम असणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. या केसमधून, पापणीवरील गाठीचे दृष्टीवरील परिणाम आणि प्रभावी विना-शस्त्रक्रिया उपचार पर्याय म्हणून प्रोप्रानोलॉल थेरपीशी संबंधित सुरक्षिततेच्या बाबी, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळण्यासाठी पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आणि पेडियाट्रिक कार्डिओलॉजी या विभागांनी एकत्रितपणे काम केले. या केसमधून वेळेवर निदान, योग्य रुग्णाची निवड, स्पेशालिस्टचे परस्पर सहकार्य आणि काळजीपूर्वक देखरेख यांद्वारे इन्फंटाईल हिमनजिओमावर विना-शस्त्रक्रिया व्यवस्थापनाची कार्यक्षमता देखील सिद्ध होते.
पालकांसाठी महत्त्वाचा संदेश आहे की, बाळाच्या त्वचेवरील प्रत्येक लाल डाग किंवा सूज ही केवळ दिसायला असणारी साधी समस्या नसते, जी आपोआप निघून जाईल. इन्फंटाईल हिमनजिओमा सौम्य असतात, पण त्यांच्या जागेवरून त्यांना उपचारांची गरज आहे की नाही हे ठरते. विशेषतः डोळ्यांभोवती असलेल्या अशा गाठींची पेडियाट्रिक स्पेशालिस्टकडून तातडीने तपासणी करून घेतली पाहिजे.




